You are currently viewing विदर्भातील लग्न

विदर्भातील लग्न

यंदा नेहमीपेक्षा जास्त थंडी होती.संध्याकाळच्या मंद हवेत सी.एस.टी. टर्मीनस लक्ष दिव्यांनी उजळून निघाला होता.ऑफिस मधून स्नॅक्स खाऊन निघालो होतो, म्हणून जास्त भूक नव्हती पण आत्माराम आणि संतोष सरांच्या आग्रहास्तव एक मसाला डोसा मागवला होता. साधारणतः संध्याकाळचे ७.४५ वाजले होते. ८.३० ची अमरावती एक्सप्रेस पकडून आम्ही सचिनच्या लग्नाला मूर्तिजापूर ला चाललो होतो. बृहृमुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाला बिलगून स्ट्रीट फूड ची रेलचेल असते. तवा पुलाव,पावभाजी, वडा, इडली, विविध प्रकारचे डोसे आणखी बरचं काही. नंतर ट्रेन मध्ये जेवणासाठी;सर्वांसाठी तवा पुलाव पॅक करून घेतलं. मिलींद सरांची फॅमिली, अमोल आणि आरुटे सर दादर हून बसणार होते.इथे प्लॅटफॉर्म वर लोखंडे साहेब आमची वाट पाहत होते.

                विदर्भाचा तसा हा माझा चौथा दौरा पण पुण्यात इंजिनिअरींग करताना असे कधीच वाटलं नव्हतं की विदर्भात जायचा कधी योग येईल किंबहूना आम्हा पश्चिम महाराष्ट्राचा तो तोराच होता- विदर्भात काय आहे मरायला, सगळे तर इकडे येतात !

                गाडी दादर सोडल्यावर सगळेजण एकत्र आलो.फक्त दोन जणांचे बर्थ सोडून सर्व जण एकाच बोगीत होतो.मिलींद सरांच्या पत्नी त्यांच्या दोन लहान मुली पण आल्या होत्या.रीतसर ओळख झाल्यावर जेवायला बसलो. घरातून काही खायला आणायचं नाही असे आधीच बजावून ठेवले होते सर्वांनी. सी.एस.टी. ला विकत घेतलेले खाण्याचे पदार्थ बाहेर काढले .गप्पा मारत जेवण आटोपलं. महापरिनिर्वाण दिनामुळे गाडी खचाखच भरली होती. मध्येच पाणी बॉटल, चहावाले गर्दी वाढवत होते.सर्व आवरुन मी वरच्या बर्थवर झोपायला गेलो. ट्रेनच्या प्रवासात मी नेहमी अप्पर बर्थ ला प्राधान्य देतो, एकतर सगळं सामान सेफ राहतं आणि वरुन सगळं डोळ्यात मावतं ;कोण बसलंय; कोण आलंय; कोण गेलंय, सगळं व्यवस्थित लक्ष ठेवता येतं.

एखाद्या मुलीकडे स्माईल देवून तिची स्माईल मिळवावी- तिही एकटी प्रवास करणारी असावी मग ओळख होवून रात्रभर गप्पा माराव्यात मग कुणास ठाऊक गोष्टी पुढे जाव्यात – प्रवासात अशी आशा मी नेहमी बाळगून असतो पण असे आजतागायत घडलं नाही. नाहीतर नेहमी एखादी मोठी फॅमिली, २-३ कटकट करणारे म्हातारे, रडणारी लहान पोरं हे नक्की असतं प्रवासात आजूबाजूला !

 थंडी वाजत होती म्हणून झोपण्यासाठी पांघरून घेतल तर बाजूच्या अप्पर सीट वर एक माणूस जोरजोरात घोरत होता. झालं;आई *** म्हणून मनातल्या मनात शिव्या दिल्या. त्याच घोरणं विचित्र होतं.त्याचा सर्वात जास्त मला त्रास होत होता. लहानपणी पुढारी वर्तमानपत्राच्या शेवटच्या पेजवर विश्वसंचार म्हणून फेमस सेगमेन्ट असायचा. त्यावेळी वाचलेली एक बातमी अचानक आठवली.परदेशात कुण्या एका बाईने नवरा खूप घोरतो म्हणून त्याला चक्क घटस्फोट दिला होता. त्यावेळी खूप फालतू न्यूज वाटली होती ती. असं कधी असतं काय. परंतु नंतर हे किती महत्त्वाचे आहे हे कळल होतं. तिच्या जागी मी असतो तर हेच केल असतं. ज्याच्याजवळ रोज झोपायच तोच जर जोरजोरात घोरत असेल तर तुम्हाला कशी झोप लागेल .मग वेगवेगळया रुम मध्ये झोपण्यापेक्षा वेगळचं झालेल बरं. इथे घटस्फोटाचा प्रश्न नव्हता म्हणून मी हेडफोननं गाणी ऐकत झोपण्याचा प्रयत्न करु लागलो.

                ठरल्याप्रमाणे लग्नाच्या आदल्या दिवशी शेगाव ला उतरलो. प्रशांत आम्हाला जॉईन झाला. तो पुण्याहून आला होता. पहाटे ४.३० वाजले होते; कडक थंडी आणि अंधार होता. आम्हाला बॅगा ठेवण्यासाठी , अंघोळ इत्यादी गोष्टी आवरण्यासाठी लॉज वा रुम पाहिजे होती. एकतर डिसेंबर चा महिना, सुटटीचे दिवस त्यामुळे खूप पर्यटक आणि भक्त घराबाहेर पडले होते. यामूळे  बहूतेक लॉज, हॉटेल फुल होते. शेगावच्या गल्लीबोळात फिरुन शेवटी एका हॉटेल मध्ये रूम मिळतील असे कळाले पण तेही अर्ध्या तासानंतर.कारण त्या ३ रूमचे गेस्ट चेकआऊट करणार होते. मग साफसफाई करुन आम्हाला मिळणार होती. सर्वानी लवकर आवरुन बाहेर निघायचं या अटीवर रुममध्ये गेलो .गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी रांगेत लागलो.लवकर आल्यामुळे तशी जास्त गर्दी नव्हती, तरीही एक तास तरी लागणार होता. शेगावचे गजानन महाराज संस्थान मला भावलेलं महाराष्ट्रातल्या स्थळांपैकी एक! कितीही गर्दी झाली तर गडबड -गोंगाट अजिबात नाही. ‘ माऊली ’ म्हणत आपुलकीने बोलणारे कार्यकर्ते. मंदीर परिसर एकदम स्वच्छ. रांगेत चहा, पाणी, बिस्किटे वाटणारे स्वयंसेवक.दर्शन घेऊन बाहेर आलो. खूप भूक लागली होती. संस्थानमध्ये प्रसादाच्या रुपात ब्रेकफास्ट मिळतो. तिथे लाईन मध्ये लागून साबुदाणा खिचडी पोट भरेपर्यंत खाल्ली. हळू हळू ऊन वाढत होत. मिलींद सरांची फॅमिली, संतोष सर ,लोखंडे साहेब आणि आरुटे सर यांना आनंदसागर पाहायचं होत .आम्ही मागच्या खेपेला पाहिल होतं तर आता पाहायची इच्छा नव्हती. म्हणून मी , आत्मा, प्रशांत त्यांचा निरोप घेऊन सचिनच्या गावी निघालो.थेट बस लगेच मिळत नव्हती म्हणून आम्ही अकोल्याला बस चेंज करुन मुर्तिजापुर ला पोहचलो.

मुर्तिजापूर स्टॅन्ड ला सचिनचा मित्र आम्हाला घ्यायला आला होता. मुर्तिजापुर हे एक तालुक्याचं ठिकाण होतं. बहुतांश गावाचे जसे बस स्टॅन्ड असतं तसं ! एकाबाजुला रसवंती गृह त्याच्याच शेजारी मुतारी ,समोर फलाट क्रमांकाच्या पाट्या .तिथे लाल रंगाचे मोठ्या आकाराचे लोखंडी वजनकाटा होता. त्याच्या मोठ्या गोलाकार स्क्रीन वर रंगीबेरंगी लाईटींग होती. बाजूला नेहमीप्रमाणे वैतागलेली चौकशी रूम होती. ‘स्वाद सुगंधका राजा बादशहा मसाला….’ची जाहिरात चालू होती .मला उगाचच त्या जाहिरातीतल्या बाईचा आवाज ओळखीचा वाटला.

“कसा झाला प्रवास?” सागर ने विचारले. “छान” असे बोलून बॅगा कार मध्ये टाकून आम्ही सचिन च्या घरी निघालो.

               लग्नाच्या आदल्यादिवशी नवरदेवाच्या घरी जातीपुजेचा आणि मुहूर्त मेढ चा  कार्यक्रम असतो तो कार्यक्रम चालू होता. दुपारचे साधारण १२ वाजले होते. सचिनला स्माईल देवून बॅगा तूर्तास त्याच्या घरात ठेऊन लागलीच आम्ही जेवायला बसलो. सचिनचे नातेवाईक आम्हाला आम्ही खूपच स्पेशल पाहूणे आहोत असे वागवत होते. मुंबई चे पाहुणे म्हणून जास्तच खातीरदारी करत होते. जेवून थोडा वेळ मंडपात बसून आम्ही हॉटेल योगी ला पोहचलो.

थंडीचे दिवस असले तरी रखरखतं दुपारचं ऊन होतं. रात्रीचा प्रवास, दुपारची धावपळ यामूळे  बाकीचे झोपून गेले रुममध्ये. मीपण झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप काही येत नव्हती. तसेही कोणत्याही ट्रीपला गेल्यावर जास्तीत जास्त परिसर पाहणे, जाणून घेणे ,आस्वाद घेणे यामताचा मी आहे. झोपतर काय इथे मुंबईत घरी कितीही झोपू शकतो. मी खाली आलो . हॉटेल तस जास्त मोठं नव्हतं. खाली किचन, रेस्टारंट आणि समोर मोठी पार्किंगसाठी जागा . समोर एक छोटं गार्डन बनवल होत. गार्डनमध्ये २-३ डायनिंग टेबल होते. समोर राज्य महामार्ग  आणि हॉटेल च्या मागे आणि बाजूला शेती सारखी रिकामी जागा होती. हॉटेल वाल्याशी गप्पा गोष्टी करून ,आजूबाजूची थोडी माहिती घेऊन वर रूम मध्ये आलो. तोपर्यंत प्रशांत आणि अमोल जागे झाले होते. प्रशांतचं पण लग्नासाठी मुली बघणं चालू होतं. त्यामुळे त्याने फोनमध्ये ज्योतिषीचे कोणतेतरी अँप टाकलं होतं. त्यावर त्याने एकेकांचे भविष्य वाचायला चालू केलं. एकतर आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले ,हिंदी फक्त शाळेत पास होण्यासाठी जेमतेम शिकलेलो. हिंदीमधून भविष्य वाचताना हसू येत होतं.

“आपके चरण स्थल पर शनि एवं गुरु की दुविधा” असे अस्सल हिंदी वाक्य प्रचार मराठी सांगलीच्या टोन मध्ये कॉमेडी वाटत होते.

                सगळे उठल्यावर आवरुन खाली आलो .थोडीशी भूक लागली होती. हॉटेल वाल्याकडे काही नव्हते ,म्हणून चहा बिस्किटे खाल्ली. थोडा अंधार पडल्यावर सचिनच्या घरी आलो. तिकडे बँजो -वरात टाईप मिरवणूक होतं. आम्हीही नाचलो. तोपर्यंत मिलींद सर, संतोष सर आणि बाकीचे जॉईन झाले. थंडीत नाचायला मस्त वाटत होतं. मध्येच सचिनचा मित्र वारंवार इशारे देऊन सांगत होता की ‘त्याची’ व्यवस्था केली आहे पण ‘आम्ही नाही त्यातले ’म्हणून आम्ही इग्नोर करत होतो. 

                नवरदेव मारूतीला नमस्कार करुन घरी परतला तशी मिरवणूक संपली. रात्रीचे १० वाजले होते. आम्ही हॉटेल ला परतलो, हॉटेल वाल्याला जेवण बनवून तयार ठेवण्याची आधीच सूचना दिली होती.दोन टेबल जॉईन करुन आम्ही सगळे गार्डन मध्ये बसलो. कडाक्याच्या थंडीत आम्ही कुडकुडत होतो.फक्त आमचाच ग्रुप होता हॉटेलमध्ये. दोन जागी शेकोट्या पेटवल्या होत्या. मंद प्रकाशात आम्हाला वेटर जेवण वाढत होता. मसाला पापड, बाजरीची भाकरी, वांग्याची खरपूस तेलात तळलेली भाजी. सावजी मसाल्याची तिखट चव. मन आणि पोट भरून जेवलो. सकाळी लवकर उठून लग्नासाठी परतवाडा या ठिकाणी जायचं होतं म्हणून लवकर झोपी गेलो.

                परतवाडा हे ठिकाण  मुर्तिजापूर पासून  जवळपास ८० किमी. होतं . आम्हाला न्यायला एक तवेरा गाडी आली होती. आवरुन चहा घेवून निघालो. अंतर तसं जास्त नव्हते पण रस्ता इतका खास नव्हता त्यामुळे थोडा उशीर होणार होता. आज सकाळी विनोद सातपुते आम्हाला जॉईन झाले होते. साधारणतः ९ वाजता एका ठिकाणी नाष्टासाठी थांबलो. एक छोटसं टिपीकल महामार्गावरचं पत्रांचे शेड असलेलं नाष्टा सेंटर होतं. तिथे आम्ही मिसळ ,पोहा आणि आलू बोंडा मागवला. मुंबईतल्या बटाटा वडयाला ते विदर्भात आलू बोंडा म्हणतात. पोह्यावर मटकीची भाजी टाकून देतात. त्याला मोट पोहा म्हणतात. स्वादाला विदर्भाचा तडखा होता. चहा घेवून निघालो. तिथे वॉश बेसीन वर ही मजेशीर पुण्याला लाजवेल अशी पाटी दिसली.

                साधारणतः ११.३० वाजता आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहचलो. ऊन वाढत होतं. तिकडे अक्षता ची तयारी चालू होती. भलमोठं मंगल कार्यालय होतं. बाजूला जेवणासाठी स्वतंत्र मंडप टाकला होता. लोकांची लगबग वाढत होती. इथे परत एकदा नवरदेव घोडयावरुन मारुतीला जाणार होता. थोडंफार नाचलो .ऊन जास्त होतं . मेकअप बिघडेल म्हणून लगेच कार्यालयात येऊन मागे गाद्यांवर विसावलो. समोर मेन स्टेज च्या बाजूला एक लहान स्टेज बनवला होता. त्यावर एक स्त्री गायक आणि  एक पुरुष गायक गाणी गात होते.त्यांच्या मागे ३-४ वादक मंडळी होती.बहुदा विदर्भातल्या लग्नात हि पद्धत असावी. त्यांच्या गायनाने वातावरण एकदम जिवंत आणि प्रसन्न वाटत होतं. मधूनच एखादया पाहुण्याची अनाउसमेंट होत होती. नेहमी लग्नात जशी लगबग असते तशी चालू होती. नवरी डोलीमधून आली. काही वेळात बाकीच्या औपचारिकता आवरुन  अक्षता पडल्या. जेवणाची व्यवस्था तर एकदम चोख होती. सूप पासून ते बनारसी पान पर्यंत असे सर्व पदार्थ होते. प्रशांत ची पुण्याला जायची ट्रेन लवकर असल्यामुळे आम्ही सगळे जेवण आटपून ,स्टेज वर जाऊन लग्नाला आल्याचा पुरावा म्हणून फोटो काढून मंडपातून बाहेर पडलो.

 प्रशांत ला बडनेरा स्टेशन ला ड्रॉप करुन आम्ही अमरावती स्टेशन गाठलं. सायंकाळी ७ वाजताची मुंबईला जाणारी ट्रेन होती. आम्ही जवळपास २ ते ३ तास आधी पोहचलो होतो. वेटींग रुम मध्ये बॅगा ठेवल्या. खूप वेळ होता म्हणून बॅगांजवळ मिलींद सरांच्या फॅमिली ला बसवून बाहेर पडलो. अमरावती स्टेशन तसं जास्त मोठ नव्हतं. घाई गर्दी अजिबात नाही. लोकांची तसेच ट्रेन ची ही वर्दळही कमी होती. स्टेशनच्या बाहेर टपरीवर एक चहा घेतला. जवळच फळ मार्केट होतं. तिथून संत्री विकत घेतली. ७ वाजताची ट्रेन असल्यामुळे जेवण पार्सल घ्यायचं ठरवलं. जवळच एक छोट्याश्या हॉटेल मधून झुणका भाकरी, मिरचीचा ठेसा पार्सल घेतला, आणि ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनला आलो.

                साधारणतः ९ वाजता आम्ही सगळेजण एका बोगीत एकत्र येऊन जेवलो. थोडयावेळ गप्पा मारुन सर्वजण आपआपल्या बर्थवर झोपण्यासाठी गेले. ट्रेन सुसाट होती. थंडी जाम वाजत होती. वरचे दोन छोटे फॅन जोरात फिरत होते.गेले दोन दिवस सर्व कसे पटापट होत होतं.पण एकूणच लग्नसमारंभ चा विषय मनात सारखा घोळत होता.अरेंज मॅरेज ही किती अवघड प्रोसेस आहे. एक तर जास्त ओळख नसते. असलीच तर ३ ते ४ महिने आणि ३ ते ४ महिने चांगल राहून आपण चांगले आहोत असे दाखवता येत. संपूर्ण कुटुंबाची जास्त ओळख होत नाही. प्रायॉरिटीज ठरवता येत नाहीत . सर्व रितीरिवाज प्रमाणे जाव लागतं. मोठं लग्न, मोठं कार्यालय, सर्व पाहुण्यांना फुल आहेर, संसार सेट, जेवण किती आणि काय. त्यात रुसवे फुगवे. जेवण चांगल नव्हते असे वरून टोमणे. एवढा अफाट खर्च कशासाठी. लग्न समारंभात फक्त नवरा-नवरीला आपलं काहीतरी होतय अस वाटत असतं. बाकी कुणाला काही देण घेणं नसतं. ते दोघं बिचारे प्रत्येक फोटोला स्माईल देण्याचा प्रयत्नात अवघडल्यासारखं दिसतात. लग्न कसं असाव- छोटसं डेस्टनिेशन वेडिंग. एकदम जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी. पैसा फक्त नवरा बायको वर खर्च झाला पाहिजे. इतर गोष्टीवर पैशे खर्च करण्यापेक्षा हनिमून म्हणून वर्ल्ड टूर किंवा युरोप टूरला जाता येईल.नातं फुलवायला खूप वेळ दिला पाहिजे. नुसता मुलगा मुलगी नाही तर दोन्ही फॅमिलीनीही! मग मुलगी लग्नानंतर जाताना रडण्याचा प्रश्नच नाही. उलट हसत गेली पाहिजें. नाहीतर नंतर बहुतेकदा बायको खूश व्हावी म्हणून तिच्या आईवडिलांच्या वाढदिवसाच्या शुभेच्या चा व्हाट्सअँप स्टेटस फॉरमॅलिटी म्हणून ठेवायला लागू नये- ते आपसूक झालं पाहिजे. असे कितीतरी विचार मनात येत होते. त्यात कधी झोप लागली कळालेच नाही. 

जेव्हा डोळे उघडले तेव्हा “मध्य रेल्वेचे हे ठाणे  स्टेशन आहे. आपले तिकीट तपसणीसाठी तयार ठेवावे “अशी अनाउसमेंट कानावर पडली.