You are currently viewing कोकणाची धावती भेट

कोकणाची धावती भेट

काल गणपतीपुळे,रत्नागिरी ला ऊसेन बोल्ट भेट झाली अर्थात तो ज्या गती ने धावतो तशी वेगवान भेट झाली.निमित्य होते मित्राचं लग्न ! लग्न तसं लांजा या गावी होतं पण रत्नागिरी आणि गणपती पुळे ला जायचा  मोह टाळता आला नाही.खूप वेळ नव्हता हे माहिती असूनही  मी तिकडे जायच्या हट्टाने पेटलो होतो. 

कोकण म्हंटल कि पु लं आठवतात.नारळ-सुपारीच्या बागा, आंबा, फणस, काजू आणि त्यांनी वर्णन केलेली अंतू बर्वा आणि त्यांच्यासारखी बऱ्याच कलाकृती डोळ्यांसमोर येतात.

इयत्ता 6 ला आमच्या शाळेची सहल या भागात गेली.होती.कोल्हापूर-रत्नागिरी-पाली-पावस-गणपती पुळे-वारणानगर असा सहलीचा रूट होता.एस.टी. महामंडळ ची बस होती. त्यावेळच्या जुन्या बसेसनां मागील बाजूला एकच दरवाजा असायचा.मी आणि गिरीश शेवटून दुसऱ्या सीट वर बसलो होतो.गाण्यांच्या भेंड्या वगैरे पारंपरिक गोष्टी चालू होत्या. मुलं विरुद्ध मुली, मग भेंडी चढल्यावर चिडवणं! माझ्या समोरच्या सीट वर वर्गातल्या त्या काळातल्या सर्वांत सुंदर दोन मुली बसल्या होत्या.समोरच्या सीट च्या खाली त्यांनी काढलेल्या सॅंडल आणि चप्पल आम्ही मागे ओढून गायब केल्या होत्या. सीट च्या गॅप मधून त्यांच्या डोक्यावरचे केस खाली झुलत होते.मी आणि गिरीश ते केस हाताने मागे खेचत होतो आणि हसत होतो.त्यांना कळत होतं हे आम्ही करतोय पण का कुणास ठाऊक त्या नजर अंदाज करत होत्या.

या आणि अश्या अनेक आठवणी मी आताच्या ट्रिप च्या निमित्ताने डोळ्यांसमोरून नेल्या.खरे सांगायचं तर काही पाहण्यापेक्षा माझा प्रवास च जास्त झाला होता. मुंबईतुन आदल्या रात्री  9.45 ला दादर हुन निघालेली बस सकाळी 6 वाजता गणपतीपुळेला पोहोचायला  हवी होती. पण दुर्दवाने कशेडी घाटात एका अपघातामुळे बस तब्बल 4 तास लेट झाली.

Traffic Jam at Kashedi Ghat

सकाळी लवकर  गणपती चे दर्शन घेऊन थोडं बीच वर फिरू असा प्राथमिक प्लॅन होता पण तो फिसकटला.सकाळी 10.30ला गणपतीपुळे ऐवजी मी आधी रत्नागिरीलाच उतरलो; जवळच्या लॉज मध्ये रूम घेऊन;अंघोळ आवरून तडक लांजा ची बस पकडली.दुपारी 12.21 ची अक्षता होती ती चुकणार हे जवळजवळ स्पष्ट होतं.11 ची लांजा बस मिळाली ती 12.30 ला पोचली. पळत मी मंगल कार्यालय गाठलं; अक्षता पडल्या  होत्या म्हणून आता काय करायचं म्हणून मी पहिल्यांदा जेवून घेतलं.कारण सकाळ पासून फक्त चहावर होतो,नाश्त्यासाठी पण वेळ मिळाला नव्हता.टिपिकल कोकणी जेवण होतं.काजू मसाला,घरच्या हापूस आंब्याचा आमरस,आणि सोलकढी !

पु लं नी सांगितल्या प्रमाणे पोटभरून मनसोक्त जेवून मग मी मित्राला भेटलो.लगेच 2 वाजता ची रत्नागिरी ची बस पकडली.दुपारी 3.30 वाजता लॉज मधून checkout करून.साधारणतः सायंकाळी  4.45 ला मी गणपतीपुळे ला पोचलो.बाप्पाचं दर्शन घ्यायला रांग होती.5.30 पर्यंत  दर्शन आवरून  बीच वर पाय टेकवून आलो.6.15 ची मुंबई ची बस पकडण्यासाठी घाईघाईने मी गणपती पुळे स्टँड वर परतलो.

मी प्रवासात लहानपणीच्या गोष्टींची उजळणी करत होतो.अशीच एक इयत्ता  सातवीत असतानाची गोष्ट! बेंचेस च्या रांगेतल्या मोकळ्या जागेत चालत चालत विज्ञान शिकवण्याची मॅडमनां सवय होती.पण त्यामुळे आमची पंचायत होत होती.काही इतर time pass करता येत नसायचा. बाकीचे शिक्षक कसे स्टेज वरून खाली उतरायचे नाहीत! तर एके दिवशी मी आणि माझ्या इतर तीन मित्रांनी ठरवून मॅडम बेंच मधल्या मोकळ्या जागेतून जाताना हळूच त्यांचे केस ओढले आणि काही झालच नाही असे दाखवले. मॅडम चे केस बऱ्यापैकी लांब होते -अगदी कंबरे पर्यंत! परत अजून एकदा केस ओढले आणि तिसऱ्यांदा त्यांच्या केसांवर शाई फेकली.मॅडम ना हे सगळं कळत होतं पण मॅडम  काही त्या दिवशी बोलल्या नाहीत आणि काही झालंच नाही असे दाखवून शिकवत राहिल्या.दुसऱ्या दिवशी  बेंच वर उभा करून लाकडी पट्टीने त्याच मॅडम नी चोप दिला होता सगळ्यांना  पण सुदैवाने मी त्या दिवशी वाचलो होतो कारण मी काही कारणास्तव  शाळेला सुट्टी मारली होती. पण पुढे हे प्रकरण घरापर्यंत गेलं होतं!

Ganpatipule Temple