You are currently viewing पुतिन :महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान-Book review

पुतिन :महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान-Book review

रशिया म्हंटल कि त्याचा आक्राळविस्तार नकाशा पृथ्वीगोल वर वा आजकाल गुगल मॅप वर पाहिलेला चटकन डोळ्यासमोर येतो.ट्रान्स सायबेरियन रेल्वे,सायबेरियातले रेनडिअर ,तिथली थंडी,तिथला भूभाग कुठेतरी डिस्कवरी वा नॅशनल जिओग्राफी वर मन लावून पाहिलेलं असतं. बराचश्या वर्ल्ड वॉर रेलटेड मूवी मध्ये रशियाचा संदर्भ येतोच नेहमी.भरपूर साऱ्या युट्युब विडिओतुन वा आजकाल विडिओ ब्लॉग मधून तिथले मोठाले चर्च ,अवाढव्य मेट्रो स्टेशन्स त्यांचे प्रचंड मोठे जिने पाहून नेहमीच रशिया बद्दलचं अप्रूप वाटतं.एक वेगळंच आकर्षण.काहीतरी गूढ नेहमीच रशिया बद्दल वाटायचं.आजतागायत वाटतंय.

कुबेर सरांचं पुतिन  नावाचा पुस्तक आहे हे माहिती होतं.पण वाचण्याचा योग नव्हता आला.मागच्या काही दिवसात हे पुस्तक मिळालं आणि लागलीच हाताखालून घातलं.

रशियाचे संक्षिप्त ,पण सगळे महत्वाचे संदर्भ लेखकांनी यात लिहले आहेत.शालेय जीवनात रशियन राज्यक्रांती चा संबंध आलेलाच होता पण तो परीक्षेला मार्क मिळवण्या इतकाच.पण एकूणच भूगोल,निसर्ग,रस्ते,रेल्वे,रोड यांचा चाहता असल्याने रशिया नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू होता.

लेनिन ,स्टालिन ,साम्यवाद या गोष्टी थोड्या फार फरकाने कुठे ना कुठे वाचलेल्या होत्या.पण पुतिन या माणसाबद्दल नेहमीच आकर्षण होत.किंबहुना तसे आकर्षण तयार केलं गेलं होता. नेमकं जसे या पुस्तकात समजावून सांगितले आहे तसे!

दिसतंय तसे नाही. पुतिन काय चीज आहे हे एकदम रोमांचकारी पद्धतीने समजून सांगितले आहे. किंबहुना सगळं रोमांचकारी आहेच!पुतिन यांच्या अगदी बालपणाचे महत्वाचे किस्से हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहतात.काही प्रसंग तर इतके अप्रतिम आहेत कि एखाद्या हॉलिवूड मूवी चा स्क्रीनप्ले आहे कि काय असे वाटून जाते.

नेहमीच शांत वाटणारे पुतिन पडद्यामागे किती अमानुष आणि क्रूर आहेत हे अगदी संदर्भासहित सांगितले आहे.त्यांनी कशा प्रकारे माध्यमांना हाताळले,कसा राष्ट्रवादाचा आपल्या सत्तेसाठी पुरेपूर वापर केला याच रोमांचक वर्णन आहे.आपल्याकडे हि असेच प्रकार घडत आहेत असे वेळोवेळी हे पुस्तक वाचताना जाणवतं.

पुतिन यांनी ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्यांचाही यामध्ये उल्लेख आहे.

पुतिन वर पूर्णपणे फोकस यायला ८० पाने जावे लागतात.तोपर्यंत बदलत्या रशिया चे राजकारण,KGB,आधीचे राज्यकर्ते,त्यांच्या सवयी,कोल्ड वॉर इत्यादी घटनांची यथेच्छ मांडणी केली आहे. सुरुवातीला खूप साऱ्या संदर्भांचा, खूप साऱ्या नावांचा मारा झाल्यासारखे वाटेल पण जसजसा पुतिन यांवर फोकस येईल तसा त्या संदर्भांचा पूर्णपणे उलघडा होईल. ॲना पोलित्कोवस्काया आणि अलेक्झांडर लिटविनेन्को यांचे चॅप्टर वाचताना तर अंगावर काटा येतो. गोर्बाचेव्ह क्रेमिया मध्ये सुट्टीला आलेला असताना अचानक आलेल्या पाहुण्यांनी त्यांना नजरकैदेत ठेवण्याचा प्रसंग सुरेख मांडला आहे.रेझन या गावातील बॉम्ब स्फोटासाठी स्फोटके म्ह्णून वापरलेल्या साखरेच्या पोती यांसारख्या घटना अगदी खिळवून ठेवणाऱ्या आहेत.

पुस्तकाच्या शेवटी रशिया आणि आसपासच्या भागांचा नकाशा दिला आहे.भूभाग समजायला तो उपयुक्त ठरतो. पुस्तकातील वेगवेगळ्या व्यक्तींच्या फोटों मुळे त्यांचे व्यक्तिमत्व समजायला मदत होते.

इतके सारे संदर्भ वाचताना एक लक्षात येतं कि लेखकांनी किती अभ्यास केला असेल.आणि ते इतक्या सहज सोप्या भाषेत मांडण्याची कला तर अप्रतिमच! खास करून आपल्या आताच्या बदलत्या राजकारणाची रुची असणाऱ्यांनी तर नक्की हे पुस्तक वाचावे.

पुस्तकाचा शेवट होतो पण खूप सारे नवीन प्रश्न तयार होतात-मनं मग पुस्तकात लिहलेल्या वेग वेगळ्या घटनांची जुळवाजुळव करण्याचे परत प्रयत्न करतं.